नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाचा आज दहावा दिवस असून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. आज शेतकरी संघटनांची सरकारसोबत चर्चेची पाचवी फेरी आहे. विज्ञान भवनात ही बैठक सुरू आहे. मात्र, ही चर्चा निष्फळ होण्याची शक्यता आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत ही मागणी शेतकऱ्यांची आहे. अन्यथा चालू बैठकीतून बाहेर पडू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
हिंसेचा मार्ग निवडणार नाही
एक वर्ष पूरेल एवढं राशन आमच्याकडे आहे. मागील काही दिवसांपासून आम्ही रस्त्यांवर आहोत. आम्ही रस्त्यावर राहावे, असे सरकारला वाटत असेल तर आम्हाला अडचण नाही. आम्ही हिंसेचा मार्ग निवडणार नाही. आंदोलन स्थळी आम्ही काय करत आहोत, याची माहिती गुप्तचर संघटना सरकारला पुरवत राहील, असे शेतकरी नेत्यांनी बैठकीत सांगितले.
सरकारने लेखी द्यावे
मागच्या बैठकीत ज्या मुद्दयांवर सरकारने सहमती दाखवली होती. ते शेतकरी नेत्यांनी लेखी मागितले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी प्रतिनिधींना सांगितले, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी शेतकरी नेत्यांना संबोधित केले. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजतो. आम्ही खुलेपणाने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास तयार असल्याचे प्रकाश म्हणाले.
शेतकरी आंदोलनावरून विरोधी पक्षांचा सरकारवर दबाव -
केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने सरकारवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. सरकारने कायद्यांवर पुन्हा विचार करावा, अशी मागणी विरोधकांनी आधी केली होती. आता कायदा रद्द करावा अशी मागणीही विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी -
पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. मोहनजीत, डॉ. जसविंर सिंग आणि पंजाबी ट्रिब्यूनचे संपादक स्वराजबीर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आपले पुरस्कार परत केले आहेत. यापूर्वी काल पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला होता.