भोपाळ - भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) घेतली आहे. शार्ट सर्किमुळे आग लागून बालकांचा मृत्यू होण्याच्या घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी म्हटले आहे. या घटनेचा ४८ तासांच्या आत अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे, मध्यप्रदेशातली राजगढ येथे आले असता त्यांनी या घटनेची दखल घेतली.
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे आयोगाने ४८ तासांच्या आत अहवाल मागितला आहे. दोषींना सूट दिली जाणार नाही. ही घटना दुर्देवी असून दोषींना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आयोग आपले काम करत राहील, असे कानूनगो म्हणाले.
'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्घटना'
नवजात बालकांना रुग्णालयात ठेवण्याबाबत आरोग्य मंत्रालयाची नियमावली आहे. शिशू केअर युनिट, बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग कसा असावा यासंबंधी मंत्रालयाच्या गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे शार्टसर्किटमुळे आग लागून मृत्यू होण्याची घटना प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा केली जाईल. भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्ही ४८ तासांच्या आत अहवाल मागितला आहे. जर आम्हाला समाधानकारक अहवाल मिळाला नाही, तर आयोगाचे पथक भंडाऱ्यात जाऊन घटनेची चौकशी करेल. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आयोग प्रयत्न करत राहील, असे कानूनगो म्हणाले.