हैदराबाद :मंगळवारी आकाशात तब्बल पाच ग्रह एकाच रेषेत येणार असल्याने हा नजारा पाहण्यासारखा असणार आहे. त्यामुळे हे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी खगोलप्रेमींना पर्वणीच मिळणार आहे. नासाचे खगोलशास्त्रज्ञ बिल कुक यांच्या मते 28 मार्चला रात्रीच्या आकाशात गुरू, बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनस एका रेषेत दिसतील. हे खगोलीय दृश्य जगाच्या अनेक भागांमध्ये पाहता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रात्री आकाशात 5 ग्रहांची होईल भेट :आकाशात नुकतेच चंद्र आणि शुक्राच्या जवळ येण्याचे विलोभनीय दृष्य दिसले होते. त्यानंतर आता मंगळवारी रात्री आकाशात 5 ग्रहांची भेट होणार आहे. 28 मार्चचा दिवस मावळताच गुरू, बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनस आकाशात एका रांगेत एकत्र दिसणार आहेत. 5 ग्रहांचे हे विलोभनीय दृश्य 50 अंशांच्या मर्यादित जागेत दिसणार आहे. 28 मार्च रोजी सलग ओळीत 5 ग्रहांचे दर्शन अतिशय सुंदर असणार आहे. आकाशातील या 5 ग्रहांपैकी 4 ग्रहांचे दृश्य दुर्बिणीच्या मदतीने पाहता येणार असल्याचे मत नासाचे शास्त्रज्ञ बिल कुक यांनी व्यक्त केले आहे.
खगोलशास्त्रात म्हणतात प्लॅनेटरी अलाइनमेंट :आकाशात दिसणाऱ्या या विलोभनीय दृश्याला खगोलशास्त्रात प्लॅनेटरी अलाइनमेंट असे म्हणतात. मात्र हा योग कधी येतो, याबाबतची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. आकाशात काही ग्रह एकावेळी सरळ रेषेत दिसतात. सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा एकावेळी काही ग्रह काही काळ सूर्याच्या एका बाजूला एकत्र येतात, तेव्हा ग्रह एकमेकांभोवती असल्याचे दिसते. याला प्लॅनेटरी अलाइनमेंट असे म्हणतात.
मागील वर्षीही आला होता योगायोग :काही दिवसापूर्वी शुक्र ग्रह हा चंद्राच्या अगदी जवळ आल्याचे दृश्य आकाशात दिसले होते. त्यानंतर आता आकाशात एकाचवेळी पाच ग्रह एकत्र येत आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी ही एक पर्वणी असल्याचे दिसत आहे. असाच पाच ग्रह एकत्र येण्याचा योगायोग जून 2022 मध्ये दिसला होता. यावेळी बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस आकाशात एकत्र दिसले होते. यानंतर 11 एप्रिल 2023 ला बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनस एकत्र दिसतील. त्यासह 24 एप्रिल 2023 रोजी असे दृश्य पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आकाशात पुन्हा 29 मे 2023 रोजी बुध, युरेनस आणि शनि हे ग्रह एकत्र दिसणार आहेत. तर 17 जून 2023 ला पुन्हा एकदा आकाशात 5 ग्रह एकत्र दिसणार असल्याचे मत खगोलशास्त्र व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - Water Found on Moon : चंद्रावर पाण्याचा सापडला नवीन स्रोत; चांद्र मोहिमेवरील संशोधकांचा दावा