बंगळुरू : मैत्रिणीच्या घरी जाणाऱ्या तरुणीसोबत रॅपीडो चालकाने गैरवर्तन केल्याने घाबरलेल्या पीडितेने चालत्या रॅपीडो दुचाकीवरुन उडी घेतली. ही खळबळजनक घटना बंगळुरू शहरातील यालाहंका परिसरात घडली. या घटनेत तरुणी जखमी झाली असून गैरवर्तन करणाऱ्या रॅपीडो चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक राव असे त्या रॅपीडो चालकाचे नाव आहे. न्यायालयाने दीपक रावला कोठडी सुनावली आहे.
तरुणीने रात्री अकरा वाजता केली होती दुचाकी बुक :पीडित तरुणीने मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी रात्री अकरा वाजता रॅपिडो दुचाकी बुक केली होती. दुचाकीवर बसल्यानंतर आरोपी दीपकने ओटीपी मिळवण्याच्या बहाण्याने तरुणीचा मोबाईल काढून घेत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. नंतर त्याने दुसऱ्याच मार्गाने दोड्डबल्लापूर रस्त्याकडे दुचाकी वळवली. या प्रकाराने तरुणी घाबरुन गेली, तर रॅपिडो चालक दीपकने दुचाकी वेगाने चालवली.
तरुणीने मारली दुचाकीवरुन उडी :रॅपीडो चालक दीपक राव दुसरीकडे दुचाकी भरधाव वेगाने नेत असल्याने तरुणीने दुचाकीवरुन उडी घेतली. नागेनहळ्ळीजवळील एका खासगी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुचाकीवरून उडी मारल्याने महाविद्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने तरुणीच्या बचावासाठी धाव घेतली. हे पाहून रॅपिडो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने तरुणीच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर तरुणीने स्थानिकांच्या मोबाईलवरुन तिच्या मित्रांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पोलिसात तक्रार केली. यालाहंका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या आरोपी दीपक रावला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दारूच्या नशेत केले कृत्य :रॅपीडो चालक दीपक हा टिंडलू येथे राहत असून तो मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवाशी आहे. टिंडलू येथे तो भाड्याच्या घरात राहतो. आरोपी दीपक रावने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - Hit And Dragged In Delhi : दिल्लीत पुन्हा हिट अँड ड्रॅगचा थरार, कारने सायकल रिक्षा चालकाला 200 मिटर नेले फरफटत!