बंगळुरु -भाऊ-बहिणीचे नाते सगळ्यात श्रेष्ठ, पवित्र मानले जाते. मात्र, कर्नाटकातील चिक्कामगलुरुमध्ये या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहाण 11 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत लहाण बहिण गरोदर राहिली आहे.
चिक्कामागलुरू जिल्ह्यातील मूडीगेरे तालुक्यातील खेड्यात एका 20 वर्षीय तरूणाने आपल्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. पीडितेने भावाचे कृत्य लपविण्याचा प्रयत्न केला. घटनेबाबत कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, घृणास्पद कृत्यातून ती गरोदर राहिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे.
संबंधित घटना -
राजस्थानच्या अलवरमध्ये एका सहा वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेजारी राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तीन ते चार बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारमधील मोतिहारी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा -
बलात्काराची प्रत्येक घटना वेदनादायी तसंच बिभत्सही असते. बलात्काराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी अनेकदा कठोर कारवाईची मागणी होत असते. भारतात दुर्मिळातल्या दुर्मीळ गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात येते. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा गुन्हा 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जगभरात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. अनेक देशांमध्ये बलात्कारापेक्षा बाल लैंगिक शोषण हा अधिक मोठा गुन्हा समजला जातो.