दिल्ली -अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ( 14 मे ) ते दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करत ठाकरे सरकारपासून मुक्तीसाठी महाआरती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, जामीनावर सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्ली गाठली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्याने दिल्लीतच मुक्काम ठोकला ( Rana Couple Recite Hanuman Chalisa ) आहे.
मुख्यमंत्र्यावर टीका - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानात सभा आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. पठण झाल्यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे संकट दूर व्हावे म्हणून आज आरती केली. जिथे जिथे केंद्र सरकारचे राज्य आहेत तिथे धर्माचा प्रचार प्रसार केला जाणार आहे. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व नकली आहे. त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. हिंमत असेल तर, मुख्यमंत्र्यांनी ओवेसीचे दात पाडून दाखवावे, अशी टीका नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तर, मुख्यमंत्री आजच्या सभेची सुरुवात औरंगजेबचे नाव घेऊन करणार का?, असा सवाल रवी राणांनी उपस्थित केला आहे.