हैदराबाद Ramoji Group Statement : मार्गदर्शी चिट फंडमधील शेअर्स धमकावून वळवण्यात आल्याचा आरोप जी युरी रेड्डी यांनी मंगळवारी केला होता. मात्र तक्रारदार हे मूळचे नोएडातील आहेत. ते सध्या हैदराबादला राहतात. तर तक्रार आंध्रप्रदेशातील सीआयडीकडं कशी नोंदवण्यात आली, असा सवाल रामोजी समूहानं उपस्थित करुन तक्रारदाराच्या आरोपातील हवाच काढून टाकली आहे. आंध्रप्रदेश सीआयडीनं तक्रारदाराला मोहरा बनवून ही काल्पनीक कथा रचल्याचा आरोपही रामोजी समूहानं यावेळी केला आहे. तक्रारदारानं आपले शेअर त्याच्या संमतीनं वळते केले होते, असा खुलासा रामोजी समूहानं केला आहे. रामोजी समूहाची प्रतिमा डागाळण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचा आरोपही रामोजी समूहानं गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात केला आहे.
काय आहे प्रकरण :हैदराबाद इथं राहणाऱ्या जी युरी रेड्डी यांनी मार्गदर्शी चिट फंडवर मंगळवारी आरोप केले होते. या आरोपात त्यांनी रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव आणि व्यवस्थापकीय संचालक सी सैलाजा यांच्यावर आरोप केले होते. रामोजी समूहानं बळजबरीनं आणि धमकावून शेअर हस्तांतरित केल्याचा आरोप करत आंध्रप्रदेश सीआयडीकडं तक्रार करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तक्रारदार जी. युरी. रेड्डी यांनी दाखल केलेली 2015 ची तक्रार आणि 10 ऑक्टोबरला आंध्रप्रदेश सीआयडीकडं दाखल केलेली नवी तक्रार यामध्ये मोठी तफावत असल्याचं रामोजी समूहानं स्पष्ट केलं आहे.
रामोजी समूहानं फेटाळले आरोप :जी. युरी. रेड्डी यांनी रामोजी समूहावर लावलेले आरोप रामोजी समूहानं गुरुवारी एक निवेदन जारी करून फेटाळले आहेत. रेड्डी यांनी आंध्रप्रदेश सीआयडीकडं तक्रार दाखल केली आहे. यावर रामोजी समूहानं प्रश्न उपस्थित केला आहे. जी. युरी. रेड्डी हे हैदराबाद इथं राहतात. त्यांनी हैदराबाद इथल्या कंपनी रजिस्ट्रार किंवा एनसीएलटीऐवजी आंध्रप्रदेश सीआयडीकडं का संपर्क साधला, असं रामोजी समूहानं आपल्या निवेदनात विचारलं आहे. आंध्रप्रदेश सीआयडीनं तक्रारदाराला मोहरा बनवून ही आणखी एक काल्पनिक कथा रचल्याचा आरोपही रामोजी समूहानं केला आहे.
तक्रारदार निरक्षर नाही :तक्रारदार जी. युरी. रेड्डी यांनी धमकावून शेअर हस्तांतरण केल्याच्या आरोपाला रामोजी समूहानं फेटाळून लावलं आहे. आपण अनावधनानं ट्रान्सफर अर्जावर स्वाक्षरी केल्याचं तक्रारदारानं नमूद केलं आहे. मात्र तक्रारदार जी. युरी. रेड्डी हे निरक्षर नाहीत. त्यांनी (5H-4) अर्जावर स्वाक्षरी करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घेऊन आणि संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करुनच स्वाक्षरी केली आहे. मार्गदर्शी चिट फंडच्या अध्यक्षांना पाठवलेल्या ई मेलची वकिलांकडून तपासणी करण्यात आली होती. तक्रारदार जी. युरी. रेड्डी आणि त्यांचा भाऊ मार्टीन यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतरच त्यांनी (5H-4) अर्जावर स्वाक्षरी केली होती. त्यांचा अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांनी रामोजी राव यांचे आभार मानले होते, असा दावाही रामोजी समूहाच्या वतीनं निवेदनात करण्यात आला आहे.