नवी दिल्ली - अॅलोपॅथीवर भाष्य केल्यानंतर वादात सापडलेले योगगुरू बाबा रामदेव कोरोना विषाणूची लस टोचवून घेणार आहेत. यासह रामदेव यांनी इतर लोकांनाही कोरोना लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. योग आणि आयुर्वेदाबरोबरच लोकांनी कोरोना विषाणूची लसदेखील घ्यावी, असे ते म्हणाले. योगगुरू रामदेव यांनी पंतप्रधान मोदींच्या देशभरात मोफत लसीकरण मोहिमेचे कौतुक केले.
रामदेव यांनी आपल्या मागील वक्तव्यांवरून यू टर्न घेतला आहे. यापूर्वी त्यांनी लसीवर प्रश्न उपस्थित केले होते.अॅलोपॅथीमुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण गमावले आहेत. लस घेतल्यानंतरही अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे, असे ते म्हणाले होते. तसेच योग आणि आयुर्वेदाचा डबल डोस घेत असल्याने कोरोना लस घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. योग आणि आयुर्वेदाचा चिलखत आहे आणि कोरोना विषाणू त्याचे काहीही करू शकत नाही, असाही दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आता त्यांनी कोरोना लस घेण्याचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट नाही.
डॉक्टर हे देवदूत...
रामदेव यांनी डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधले. डॉक्टरांशी माझे कोणताही भांडण नाही. डॉक्टर हे पृथ्वीसाठी वरदान आहेत. माझा लढा डॉक्टरांविरूद्ध नाही किंवा अॅलोपॅथीविरोधात नाही. तर ड्रग माफियाविरूद्ध आहे, असे ते म्हणाले.