मुंबई Ramdas Athawale on Nitish Kumar : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संततिनियमनाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनामा मागणी केली. महिलांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्या वक्तव्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी महिलांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान योग्य नाही. महिलांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे, पण तसं होत नाही. त्यांच्यावर काही कारवाई झालीच पाहिजे, असंही आठवले म्हणाले.
सर्व स्तरातून टिकास्त्र : मुख्यमंत्री हा एक जबाबदार व्यक्ती असायला हवा. त्यांनी माफी मागितली आहे, पण तुम्हाला जे हवं ते बोलणं, त्यानंतर माफी मागणं याला काही किंमत नाही. भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी बुधवारी म्हटलं की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य लज्जास्पद, निंदनीय आणि वेदनादायक आहे. नितीश कुमार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं विधान लज्जास्पद, निषेधार्ह आणि वेदनादायक आहे. यावरून इंडिया आघाडीतील नेत्यांची महिलांसाठी असलेली मानसिकता दिसून येते, असं भाजपा नेते म्हणाले. बुधवारी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बिहार विधानसभेत गोंधळ झाला. जन्म नियंत्रणावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात विरोधी सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.