नवी दिल्ली - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटके, मुंबई गुन्हे शाखेमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसूलीचे टार्गेट दिल्याचे परमबीर सिंग यांच्याकडून आरोप झाले. या स्फोटक घटनाक्रमानंतर राज्यातील वातवरण ढवळून निघाले आहे. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी मी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना आरपीआय (ए) पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट देण्याची मागणी केली. ही एक गंभीर बाब आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार हटविले जात नाही. तोपर्यंत चौकशी होऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आधार घेत राज्यातील विरोधी पक्षांनी राज्यपालाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वीही केली होती राष्ट्रपती राजवटीची मागणी -
यापूर्वी रामदास आठवले यांनी गृह मंत्री आमित शाह यांना पत्र लिहत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा विचार करत येथे राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केली होती. तसेच 20 मार्चला टि्वट करून त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप गृहमंत्र्यांनी नाकारले आहेत. मात्र, असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा कोलमडली आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लौकीकावर कलंक लागला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही; अशा आशयाचे ट्विट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते.
हेही वाचा -आपले विरोधीपक्षनेते हे खुप मोठे नेते; म्हणूनच ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होवू शकले नाहीत