नवी दिल्ली Ramayana Mahabharata in NCERT Books : रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात यावा तसंच राज्यघटनेची प्रस्तावना वर्गाच्या भिंतींवर लिहिली जावी, अशी शिफारस नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या उच्चस्तरीय समितीनं केलीय. या समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी ही माहिती दिलीय. गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या या सात सदस्यीय समितीनं सामाजिक विज्ञानावरील अंतिम स्थान दस्तऐवजासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. जो नवीन NCERT पाठ्यपुस्तकांच्या विकासाचा पाया घालण्यासाठी एक महत्त्वाचा विहित दस्तऐवज आहे. NCERT नं अद्यापपर्यंत या शिफारशींवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
हजारो विद्यार्थी देशभक्तीच्या अभावानं देश सोडतात : इसाक म्हणाले की, 'समितीनं सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्यं शिकवण्यावर भर दिलाय. आमचा विश्वास आहे की विद्यार्थी शालेय जिवनात त्यांचा स्वाभिमान, देशभक्ती आणि त्यांच्या राष्ट्राचा अभिमान निर्माण करतात. तसंच ते म्हणाले की दरवर्षी हजारो विद्यार्थी देशभक्तीच्या अभावामुळं देश सोडून इतर देशांचं नागरिकत्व घेतात. त्यामुळं त्यांची मुळं समजून घेणं आणि त्यांच्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. काही मंडळं आधीच रामायण आणि महाभारत शिकवतात, परंतु हे अधिक व्यापक पद्धतीनं केलं पाहिजे, असंही इसाक म्हणाले. या पॅनेलनं इयत्ता 3 ते 12 वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्राचीन इतिहासाऐवजी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची आणि 'इंडिया' नाव बदलून 'भारत' करण्याची शिफारस केली होती.