अयोध्या MP Shrikant Shinde Visits Ayodhya : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. त्यावेळी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 11 कोटी रुपयांची देणगी देण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत या दोघांनी अयोध्येला जाऊन ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडं हा धनादेश सुपूर्द केलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत ही माहिती दिलीय.
हा आमचा उत्साह वाढवणारा क्षण : शिंदे गटाकडून धनादेश मिळाल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि राम भक्तांच्यावतीनं 11 कोटी रुपयांचा धनादेश दिलाय. ही रक्कम बँकेतही ट्रासन्फर झाल्याचं त्यांनी सांगितलंय. या पैशांची पावतीदेखील त्यांना देण्यात आलीय. हा आमचा उत्साह वाढवणारा क्षण आहे. मी महाराष्ट्रातील जनतेच्याप्रती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रती तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो."