नवी दिल्ली Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनी म्हणजेच 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं याबाबत परिपत्रक काढलं असून, 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी देण्याचा आदेश जारी केलाय. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी अयोध्येत पूजाविधी सुरू झालाय. या सोहळ्यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे. देशभरातही 22 जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
केंद्र सरकारनं काढले आदेश : केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'कर्मचाऱ्यांच्या तसंच नागरिकांच्या विनंतीमुळं केंद्र सरकारनं देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. या घोषणेची माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, 'अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील.'
अर्धा दिवस सुट्टी : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत भारतभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये अर्धा दिवस सुट्टी असणार आहे. देशातील नागरिकांना प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहता यावं यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
देशात दिवे लावण्याचं आवाहन : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांकडून अभिप्राय घेतला आहे. यावेळी सर्वांनी देशात दिवे लावावेत, असं मोदींनी सांगितलं आहे. तसंच 22 जानेवारी रोजी गरिबांना अन्नदान करण्यासही मोदींकडून सांगण्यात आलंय. 22 जानेवारीनंतर प्रत्येक खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना ट्रेनमधून अयोध्येला दर्शनासाठी पाठवावं, असंही मोदींनी सांगितलंय.
असा होणार प्राणप्रतिष्ठापना सोहळा : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. राम मंदिरात गर्भगृह असेल, येथेच पाच मंडप असतील. मंदिर तळमजल्यावर असेल, असं मंदिर प्रशासनानं सांगितलं. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर अजून काही काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पहिल्या मजल्यावर राम दरबार बांधण्याचं काम सुरू आहे.
मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना : मंदिराचा दुसरा मजला धार्मिक विधींसाठी वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ तसंच विधी करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता शुभ मुहूर्त असल्याचे मंदिर अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटलं होतं. 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक होणार आहे. याआधी रामाच्या जुन्या तसंच नव्या दोन्ही मूर्ती नव्या राम मंदिरात बसवल्या जाणार आहेत. याशिवाय, 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
हे वाचलंत का :
- मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात होऊ शकतो बदल, आता 'या' दिवशी जाणार अयोध्येला
- अयोध्येत प्रभू रामाचा लवकरच प्राणप्रतिष्ठापना सोहळा, आज होणार 'ही' विशेष पूजा
- राम मंदिराच्या इतिहासावर सुरू होणार अभ्यासक्रम, या विद्यापीठात शिकायला मिळणार रामजन्मभूमीचा इतिहास