अमेठी Pran Pratistha Ayodhya Entry : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज व्हिआयपी सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अयोध्येला न जाण्याबाबत जागरुक करण्यात येत आहे. तसंच बस आणि ट्रेनची तिकिटंही रद्द केली जात आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दोन दिवस आधी 20 जानेवारीपासून सर्वसामान्यांना अयोध्येला जाण्यास बंदी घालण्यात आलीय. यासाठी अमेठीशिवाय इतर जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आलीय.
अनेक मान्यवरांच्या सहभागामुळं कडक सुरक्षा व्यवस्था :22 जानेवारी रोजी रामनगरीत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्तानं देश-विदेशातील भाविकांना रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचायचं आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांच्या सहभागामुळं कडक सरक्षाव्यवस्था लागू असणार आहे. या दिवशी अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था चोख असणार आहे. अयोध्येत पर्यटकांची गर्दी वाढणार असल्यानं राहण्यासाठी हॉटेल्स आणि भोजनालयांमध्येही खूप गर्दी होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही 22 जानेवारीला अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं सर्वसामान्यांना अयोध्येला जाण्यापासून प्रशासनाकडून रोखलं जातंय.