देहराडून :केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७२ दिवसांपासून देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासाठीच शेतकरी संघटनांनी सहा फेब्रुवारीला दुपारी १२ ते तीन वाजेपर्यंत देशात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आज केलेल्या घोषणेनुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हे आंदोलन होणार नाही.
जिथे असाल तेथूनच आंदोलनात सहभागी व्हा..
उत्तराखंडमध्ये सहा फेब्रुवारीला चक्काजाम होणार नाही, त्याऐवजी शेतकरी आपल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देतील असे टिकैत यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देशभरातील लोकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनही केले. "शेतकऱ्यांपैकी कोणालाही दिल्लीमध्ये येण्याची गरज नाही, आपण जिथे असाल तिथेच शांततापूर्ण मार्गाने चक्काजाम करा" असेही टिकैत यावेळी म्हणाले.