नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. आज शेतकऱ्यांनी देशभर चक्का जाम करत कृषी कायद्यांचा निषेध नोंदवला. आता हे आंदोलन महात्मा गांधी यांची जयंती अर्थात 2 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. 2 ऑक्टोंबरनंतर आम्ही आमची पुढील योजना जाहीर करू. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.
कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. ऑक्टोबरपर्यंत सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीवर आंदोलक ठाम असून आंदोलनाच्या समर्थनार्थ हा देशव्यापी चक्का जाम करण्यात आला. प्रजास्ताक दिनी ट्रॅक्टर परेडला गालबोट लागल्यानंतर शेतकरी घराकडे निघाले होते. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज सीमेवर येऊ लागली आहे.