नवी दिल्ली- पेगासस हेरगिरी आणि तीन कृषी कायद्यांसह विविध मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेत केली. विरोधी पक्षाच्या गोंधळानंतर उद्यापर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा हे सभागृहातील टेबलवर चढले. त्यांनी सभापतींच्या टेबलच्या दिशेने फाईल फेकली. आपचे खासदार संजय सिंह यांनीही टेबलवर चढून घोषणाबाजी केली. त्याचबरोबर इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ केला.
विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ केल्यानंतर पीठासीन अध्यक्ष भुवनेश्वर कालिता यांनी दोन वाजून 17 मिनिटाला 15 मिनिटे कामकाज स्थगित केले. 15 मिनिटानंतर पीठासीन अध्यक्षांनी अर्धा तास कामकाज स्थगित केले.
हेही वाचा-अफगाणिस्तानातील भारतीयांना तातडीने मायदेशात आणा, सरकारचे कंपन्यांना निर्देश
अर्ध्या तासानंतर दुपारी तीन वाजता कामकाज सुरू केले. पीठासीन अध्यक्ष भुवनेश्वर कालिता यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांना कक्षामध्ये आमंत्रित केले आहे. त्यानंतर एक तास कामकाज स्थगित करण्यात आले. सभागृहाचे काम सुरू झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत (बुधवारी) स्थगित करण्यात आले आहे.