महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर चकमकीत ठार, अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता - राजौरी चकमक

Rajouri Encounter : भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा एक कमांडर ठार झाला. हा कमांडर डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा संशय आहे.

Rajouri Encounter
Rajouri Encounter

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 10:31 PM IST

श्रीनगर Rajouri Encounter : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चकमक जारी आहे. गुरुवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा संघटनेचा टॉप कमांडर आणि त्याच्या साथीदाराचा खात्मा केला.

डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, राजौरी जिल्ह्यातील धर्मसाल-कालाकोटच्या बाजीमाल भागात ही चकमक झाली. या भीषण चकमकीत, लष्कर-ए-तैयबाचा 'कारी' या सांकेतिक नावानं ओळखला जाणारा कमांडर त्याच्या साथीदारासह ठार झाला. ठार झालेला कमांडर आणि त्याचा गट गेल्या वर्षभरापासून राजौरी-पुंछ परिसरात सक्रिय होते. हा कमांडर डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचंही समजतं.

दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा उद्देश होता : ठार झालेल्या दहशतवाद्याला या प्रदेशात दहशतवाद पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. तो सुधारित स्फोटक उपकरणं (आयईडी) हाताळण्यात तज्ञ होता. तसेच तो एक प्रशिक्षित शार्प शूटर असल्याची माहिती मिळाली आहे. तो डोंगरांच्या गुहेत लपला होता. सुरक्षा दलांनी त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं आहे.

सहकाऱ्यालाही कंठस्नान : विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, सैन्य आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली आणि परिसराला वेढा घातला. शोध मोहीम सुरू असताना, परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला मारण्यात आलं. यासह त्याचा एक सहकारी देखील मारला गेल्याचं सुरक्षा दलांनी सांगितलं.

दोन दिवसांपासून चकमक जारी : राजौरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चकमक जारी आहे. या आधी बुधवारी (२२ नोव्हेंबर) देखील येथे चकमक झाली होती. या चकमकीत सैन्याच्या दोन कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलं. तर दोन जण जखमी झाले होते. रात्री गोळीबार थांबवण्यात आला. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा चकमक सुरू झाली.

हेही वाचा :

  1. राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान हुतात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details