नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सोमवारी अमेरिका आणि भारतीय संरक्षण नवकल्पना क्षेत्रातील सहकार्याच्या उद्देशाने इंडस-एक्स या नवीन उपक्रमावर चर्चा केली. संरक्षण क्षेत्रातील संयुक्त संशोधन, विकास आणि उत्पादनाच्या संधी शोधण्यावर इंडस-एक्सचा भर आहे. या नवीन उपक्रमांतर्गत, भारत आणि अमेरिका जेट इंजिन, लांब पल्ल्याचा तोफखाना आणि पायदळ लढाऊ वाहनांच्या सह - उत्पादनाची शक्यता शोधत आहेत.
इंडस-एक्सवर चर्चा : चर्चेनंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन प्रसारमाध्यमांना संबोधित करताना म्हणाले की, 'आम्ही इंडस-एक्स या महत्त्वाच्या नवीन उपक्रमावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींच्या वॉशिंग्टन दौर्याच्या अनुषंगाने इंडस-एक्सचे औपचारिक प्रक्षेपण केले जाईल. आम्ही केवळ तंत्रज्ञानचे आदान प्रदान करत नाही, तर आम्ही एकमेकांना नेहमीपेक्षा अधिक सहकार्य करत आहोत.'
औद्योगिक सहकार्यासाठी रोडमॅप तयार केला :भारत आणि अमेरिकेने सोमवारी संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी एक रोडमॅप तयार केला, जो नवीन तंत्रज्ञानाचा सह-विकास आणि विद्यमान व नवीन प्रणालींचे सह-उत्पादन तसेच दोन्ही देशांच्या संरक्षण स्टार्ट-अप इकोसिस्टमला बळकट करण्यासाठी संधी ओळखेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पुढील काही वर्षांसाठी धोरणात्मक दिशा ठरविणारा रोडमॅप संपन्न झाला. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण सचिवांचा हा दौरा होत आहे.
संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित : बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, ही चर्चा सुरक्षा सहकार्य वाढविण्यासह अनेक क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी महत्वाची होती. या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा :
- Lloyd Austin : 'अमेरिका इंडो-पॅसिफिकमध्ये नाटो..', संरक्षण सचिव लायड ऑस्टिन यांचे मोठे वक्तव्य