बाराबंकी - सरकारने जर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलण्याचे स्वातंत्र्य दिले. तर लवकर तोडगा निघेल, असे भारतीय किसान युनियनचे (भाकियू) राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले. ते किसान महापंचायतीला संबोधित करत होते. केंद्र सरकारने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पिंजऱ्यातील पोपट करून टाकलं आहे, असेही ते म्हणाले.
सरकारने राजनाथ सिंह यांना बोलण्याचे स्वातंत्र्य दिले. तर तोडगा निघेल. याचा मला पूर्ण विश्वास आहे. तसे केल्यास भाजपची विश्वासार्हताही शिल्लक राहील. शेतकरी राजनाथ सिंह यांचा आदर करतात. पण सरकार त्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची संधी देत नाही. हे सरकार हट्टी आहे, सरकारने शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि दृष्टीकोन बदलावा, असे टिकैत म्हणाले.
पूर्वी देशात हिंदू आणि मुसलमान प्रेमाने राहत होते. मात्र, 2013 पासून भाजपाने मुस्लिमांबद्दल बरेच गैरसमज पसरवले. परंतु, आता लोकांना भाजपाच्या युक्त्या समजल्या आहेत. म्हणूनच आता त्यांची डाळ' शिजणार नाही, अशी टीका त्यांनी भाजपावर केली.