नवी दिल्ली -वयाच्या 40 व्या वर्षी भारताच्या पंतप्रधान पदाच्या गादीवर विराजमान झालेले राजीव गांधी हे सर्वात पहिले युवा पंतप्रधान होते. आज त्यांची 77 वी जयंती आहे. या निमित्ताने काँग्रेस देशभर कार्यक्रम आयोजित करणार आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण काढली जाणार आहे. राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजधानीत फोटो प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. काँग्रेस हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करते.
सामाजिक ऐक्य पंधरवाडा -
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रात 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 याकाळात सामाजिक ऐक्य पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे हे या पंधरावड्याचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
सर्वांत तरुण पंतप्रधान -
राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामातून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुसाईड बॉम्बरच्या साहाय्याने हत्या -
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला होता. श्रीलंकेतील तामिळ दहशतवाद संपवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. त्याच तामिळ दहशतवाद्यांनी 21 मे, 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे महिला सुसाईड बॉम्बरच्या साहाय्याने राजीव गांधी यांची हत्या केली होती. या हत्याकांडाचा सूत्रधार असलेला प्रभाकरन याचा 2009-10मध्ये श्रीलंकन सैन्याने खात्मा केला होता. आज जरी राजीव गांधी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण लोकांच्या कायम स्मरणात राहिल.
तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवला असल्याचे जाहीर केले. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार देण्याबाबत का शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केलेला आहे. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना देशांमध्ये माहिती प्रसारण तंत्रज्ञान व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यामुळे राजीव गांधी स्मृती दिनानिमित्त माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात यावा याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -बैलगाडी शर्यत, मूक मोर्चा, रणनीती आणि बरंच काही... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर