महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Politics In Goa: गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी राजेंद्र आरलेकरांचे नाव चर्चेत, प्रमोद सावंतांनीही घेतली पंतप्रधानांची भेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बहुमत प्राप्त होऊनही गोव्यात अद्याप भाजप मुख्यमंत्री पदाच्या नेत्याची निवड करू शकलेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Caretaker Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि माजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Former Health Minister Vishwajit Rane) यांच्यातील वादाची कोंडी फोडताना भाजपने गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी हिमाचल प्रदेश चे राज्यपाल राजेंद्र आरलेकर (Governor Rajendra Arlekar) यांचे नाव चर्चेत आहे.

Rajendra Arlekar
राजेंद्र आरलेकर

By

Published : Mar 16, 2022, 1:25 PM IST

Updated : Mar 16, 2022, 2:03 PM IST

पणजी:नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि बहुमतही प्राप्त केले. मात्र विश्वजित राणे अचानकपणे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरल्यावर पक्षश्रेष्ठी समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी संघाने व केंद्रीय नेतृत्वाने राजेंद्र आरलेकर यांच्या नावाला पसंती दिली असल्याची चर्चा आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता आरलेकरांचाही समावेश झाला आहे.


हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांनी काल (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राजकीय परिस्थिती वर चर्चा केली. आरलेकर हे संघाचे एकनिष्ठ सदस्य आहेत. ते गोव्यात माजी मंत्री होते.

दरम्यान गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजपच्या नेत्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. "आमचा पक्ष गोव्यातील जनतेचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला पुन्हा राज्याची सेवा करण्याचा जनादेश देऊन आशीर्वाद दिला. आम्ही आगामी काळात गोव्याच्या प्रगतीसाठी काम करत राहू," असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

Rajendra Arlekar

भाजपला मिळाल्या २० जागा -

गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दणकून २० जागा मिळाल्या. दक्षिण गोव्यात ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे केवळ उत्तर गोव्यातून भाजपला अपेक्षा होती. पण निवडणुकीने वेगळेच राजकीय समिकरण समोर आणले आहे. भाजपला जशा उत्तर गोव्यात १० जागा मिळाल्या, तशाच दक्षिण गोव्यातही १० जागा मिळाल्या. ख्रिश्चन बहुल भागातही भाजपला चांगले मतदान झाले आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्या उमेदवारांनी भाजपचा मार्ग सुकर केला असला तरी हिंदुत्त्वावर एकहाती मते मिळविण्याचे कसब भाजपने शक्य करुन दाखवले.

मतमोजणीपूर्वी भाजपची कसरत -

मतमोजणीपूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला १५-१६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कॉंग्रेसला भाजपपेक्षा जास्त म्हणजेच १७-१८ जागा मिळतील, असे सांगितले जात होते. विशेष म्हणजे एमजीपीला ५-७ जागा मिळतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यामुळे एमजीपी किंग मेकरच्या भूमिकेत पुढे आला होता. यावेळी एमजीपीचे सुदीन ढवळीकर यांनी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठका केल्या होत्या. भाजपच्या बैठकीत त्यांनी प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध दर्शवला होता. तसेच मुख्यमंत्रीपद एमजीपीला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. एमजीपीला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर प्रमोद सावंत यांचे नाव वगळून भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यात विश्वजित राणे यांचे नाव पुढे होते.

विश्वजित राणे यांची राज्यपाल भेट -

काही दिवसांपूर्वी विश्वजित राणे यांनी राज्यपाल पिल्लई यांची भेट घेतली होती. तेव्हा बोलताना विश्वजित राणे म्हणाले होते, की ही खासगी भेट होती. माझ्या मतदारसंघातील कामांसंदर्भात मला त्यांच्यासोबत चर्चा करायची होती. तसेच त्यांचे आशिर्वाद घ्यायचे होते. या भेटसंदर्भात विश्वजित राणे यांनी पुरते मौन स्विकारले आहे. तसेच भाजपच्या गोटातूनही कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही. या भेटीनंतर अशी चर्चा सुरू झाली, की विश्वजित राणे मुख्यमंत्रीपदाच्या शर्ततीत आहेत. यासाठी त्यांनी एमजीपी आणि काही भाजप नेत्यांचा पाठिंबा आहे. भाजपचा हा गट सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली होती.

गोव्याच्या राणे घराण्याचा इतिहास -

माजी मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुरब्बी राजकारणी प्रतापसिंह राणे गेल्या ३२ वर्षांपासून पोरियम या मतदारसंघातून निवडून येत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना दोन पर्याय दिले होते. पोरियम येथून स्वतः लढा किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव पुढे करा. त्यामुळे विश्वजित राणे येथून निवडणूक लढण्यास उत्सूक होते. पण प्रतापसिंह यांनी विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या राणे यांचे नाव पुढे केले. दिव्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांना एकूण 17,816 मते पडली. सर्वाधिक मताधिक्याने त्या निवडून आल्या. वलपोई येथून विश्वजित राणे यांना 12,262 मते पडली. त्यांचाही मोठ्या मतांनी विजय झाला आहे. प्रतापसिंह राणे यांना भाजपने आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. यावरुन राणे कुटुंबीयांचे भाजपमधील वजन दिसून येते.

प्रमोद सावंत यांचा कसाबसा विजय -

सांकळी मतदारसंघातून प्रमोद सावंत निवडणुकीत उभे होते. त्यांना एकूण 12250 मते पडली. येथून कॉंग्रेसच्या धर्मेश संगलानी यांनी त्यांना कडवी टक्कर दिली होती. संगलानी यांना एकूण 11,584 मते पडली. मतमोजणीच्या वेळी सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये संगलानी यांनी सावंत यांना मागे टाकले होते. सावंत हरतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण अखेरच्या फेऱ्यांमध्ये सावंत यांनी गती पकडली. त्यांचा अगदी निसटता विजय झाला. सावंत विजयी ठरले असले तरी त्यांची मतदारसंघावर पकड नव्हती आणि प्रभावही नव्हता हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

राणे कुटुंब भाजपच्या सोईचे -

विश्वजित राणे हे प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. प्रतापसिंह राणे यांच्यानंतर विश्वजित राणे यांनी राणे कुटुंबीयांचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांची पत्नी दिव्या याही आता राजकारणात उतरल्या आहेत. पोरियम या पारंपरित मतदारसंघातून त्या मोठ्या मतांनी निवडून आल्या आहेत. विश्वजित यांना प्रतापसिंह राणेंचा पाठिंबा आहे. अशा वेळी मुख्यमंत्रीपदी एक मजबूत उमेदवार असणे भाजपच्या हिताचे आहे. मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्यात कुणी भाजपला यश मिळवून देऊ शकत असेल तर ते नाव विश्वजित राणे आहे, असे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची -

मतमोजणी झाल्यानंतर भाजपच्या गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली होती. यावेळी त्यांनी प्रमोद सावंत यांचे नाव घेण्याचे सोईस्कर टाळले होते. त्याला भाजपमधील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. पण गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार यात फडणवीस यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल हे मात्र नक्की आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हा अधिकार फडणवीस यांना दिला आहे.

Last Updated : Mar 16, 2022, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details