जयपूर : राजस्थानच्या बारमेरमध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच त्याच्या मुलीने पेटत्या चितेत उडी घेतली. यामध्ये ही महिला गंभीररित्या जखमी झाली होती. यावेळी नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर प्रथमोपचार करुन, जोधपूरला पाठवले. या दुर्घटनेत ही महिला सुमारे ७० टक्के भाजली गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
६५ वर्षांच्या दामोदरदास सारदा यांना बारमेरच्या रॉयल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला. यानंतर घरामध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुरुष नसल्यामुळे, दामोदरदास यांच्या सर्वात लहान मुलीने यासाठी जाण्याची तयारी दर्शवली.