जयपूर :राजस्थानच्या जयपूरमध्ये एक बलात्कार पीडिता आणि तिच्या मुलीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. आपल्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. यानंतर या दोघींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी लेखराजसह त्याच्या तीन साथीदारांना जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लेखराजने यापूर्वी पीडितेच्या घरी जात, तिला बळजबरी दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिला या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नको म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती. महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितले, त्यानंतर दोघांनी पोलिसांमध्ये लेखराजविरोधात तक्रार दाखल केली होती.