जयपूर (राजस्थान) : हरियाणात दोन जणांचे अपहरण करून त्यांना जिवंत जाळल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. राजस्थान पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, ते हरियाणा पोलिसांच्या भूमिकेची देखील चौकशी करणार आहेत, ज्यांनी गायीच्या तस्करीच्या प्रकरणात पीडितांना संशयित म्हणून मारहाण केली, असा आरोप होत आहे.
आरोपीच्या पत्नीला पोलिसांची मारहाण:पोलिस अधिकारी या घटनेच्या तपासाबाबत मौन बाळगून आहेत. सूत्रांनी सांगितले की, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, हरियाणातील आरोपीच्या गरोदर पत्नीला राजस्थान पोलिसांनी मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीकांतच्या आईचा आरोप आहे की, 30-40 पोलीस तपासासाठी त्यांच्या घरात घुसले. तो घरी नसल्याची माहिती मिळताच त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पोलीस म्हणाले, आरोप निराधार:सततच्या मारहाणीमुळे त्याच्या पत्नीला वेदना होत होत्या आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिने 18 फेब्रुवारी रोजी मृत बाळाला जन्म दिला. मारहाणीमुळे तिच्या मुलाचा गर्भातच मृत्यू झाल्याचे श्रीकांतच्या आईने सांगितले. मात्र, भरतपूरचे एसपी श्याम सिंह म्हणाले की, असे सर्व आरोप निराधार आहेत. ते म्हणाले, आमचे पोलिस पथक श्रीकांतच्या घरात शिरले नाही. प्रत्यक्षात हरियाणा पोलिसांचे पथक तेथे गेले होते. आम्ही हरियाणा पोलिसांसोबत जवळून काम करत आहोत आणि आमचे उपक्रम राबवत आहोत.