जोधपूर Rajasthan elections: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावेळी जनता राजकीय परंपरा मोडीत काढेल असं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी केरळचं उदाहरण दिल आहे. केरळमध्ये 40 वर्षात प्रथमच सत्ताधारी सरकार पुन्हा निवडून आलं. त्यांनी आपलं म्हणणं मांडतांना सांगितलं की, काँग्रेसच्या विरोधात कोणतीही सत्ताविरोधी भावना नाही. त्यामुळे काँग्रेसच पुढील सराकर स्थापन करेल. राज्यात पुन्हा त्यांचंच सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या बाहेरील नेत्यांनी वापरलेल्या भाषेवर गेहलोत यांनी टीका केली. सगळ्याच विरोधी नेत्यांनी राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार पुन्हा येणार नाही असं भाकित केलं आहे.
एक अंडरकरंट दिसत आहे. असं दिसतंय की काँग्रेस सरकारची पुनरावृत्ती होईल. - अशोक गेहलोत, मुख्यमंत्री राजस्थान
केरळचं उदाहरण -आपल्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांनी केरळचं उदाहरण दिलं. कोरोनाव्हायरस सर्व देशभरच नाही तर संपूर्ण जगात कहर करत होता. संपूर्ण देशात आलेल्या या महामारीला हाताळण्यात केरळ सरकारनं चांगली कामगिरी केली. त्या चांगल्या कामाच्या आधारे तिथलं सरकार परत आलं असं ते म्हणाले. राजस्थानच्या लोकांना हे देखील माहीत आहे की, काँग्रेस सरकारनं साथीच्या आजाराच्या हाताळणीसह अनेक आघाड्यांवर उत्कृष्ट काम केलं आहे. यामुळे प्रत्येकवेळी वेगळ्या पक्षाचं सरकार येण्याची परंपरा यावेळी मोडेल असं ते म्हणाले.
लोकांना भडकवण्याचा प्रयत्न -पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांची भाषा प्रक्षोभक असताना काँग्रेसनं आपला प्रचार विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित केला. गेहलोत पुढे म्हणाले की, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसह बाहेरून आलेल्या भाजपा नेत्यांनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही असं गेहलोत म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. जनतेला आता समजलंय की, पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार असं दिसतय, असंही गेहलोत म्हणाले.
लोकांसाठी चांगल्या योजना -गेहलोत पुढे म्हणाले की, आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी आणि 'आरोग्य हक्क' साठी चांगले कायदे केले. लोकांसाठी चांगल्या योजना आणल्या आणि आरोग्याची हमी दिली. 'रेड डायरी' वरुन गेहलोत यांच्यावर टीका होत आहे. त्याचाही गेहलोत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपा घोडे बाजारात गुंतली आहे. मात्र त्यांच्याही आता लक्षात आलं आहे की, त्यांची डाळ राजस्थानात शिजणार नाही. त्यामुळे ते काहीही मुद्दे काढत आहेत, असं गेहलोत म्हणाले. गेहलोत पुढे म्हणाले की, भाजपा नेत्यांनी वापरलेली भाषा चिथावणीखोर आहे. आम्ही त्यांना स्थानिक मुद्द्यांवर बोलण्याचे, आमच्या योजनांवर बोलण्याचे आव्हान दिले होते, मात्र त्यावर कुणीच काही बोलले नाही.