जयपूर :राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील शितयुद्ध पुन्हा एकदा शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रयत्नामुळे हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वी तीन वेळा सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मिटवला होता. तरीही या दोन्ही नेत्यांनी आपला वाद सुरूच सुरुच ठेवला होता. आता पुन्हा सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांमध्ये हातमिळवणी झाली असली, तरी ही हातमिळवणी किती दिवस राहणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.
तीन वेळेस झाला समझौता : राजस्थानमध्ये डिसेंबर 2018 मध्ये सरकार स्थापनेपासून दोन्ही नेत्यांमधील राजकीय भांडण सुरू झाले. डिसेंबर 2018 मध्ये जेव्हा गेहलोत यांनी मुख्यमंत्री होण्याच्या बाबतीत सचिन पायलटचा पराभव केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील दरी कमी करण्यासाठी राहुल गांधींसह गेहलोत आणि पायलट यांची हसतमुख छायाचित्रे समोर आली. पण ही छायाचित्रे केवळ दिखाव्यासाठीच राहिली आणि 2 वर्षातच सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड केले.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला आव्हान :सचिन पायलट यांनी जुलै 2020 मध्ये त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान देत दिल्लीला गेले. सुमारे 35 दिवस चाललेल्या गदारोळानंतर ऑगस्ट 2020 मध्ये प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांनी सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यासाठी हस्तक्षेप केला. यानंतर ऑगस्ट 2020 मध्येच मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि केसी वेणुगोपाल यांची एकजूट दाखवणारी छायाचित्रे समोर आली. मात्र त्यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरूच होते.