जयपूर : राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी नवा पक्ष स्थापन केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही पक्षाचे नेते आहेत. काँग्रेस हायकमांडने 29 मे रोजी दोघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि दोघेही निवडणुकीत एकत्र उतरण्याच्या तयारीत आहेत.
'नवा पक्ष काढण्याची चर्चा मीडियाचीच निर्मिती' : सचिन पायलट नवा पक्ष काढणार ही चर्चा मीडियाचीच निर्मिती असल्याचे सुखजिंदर सिंग रंधावा यांनी स्पष्टपणे सांगितले. सचिन पायलट यांना ना आधी पक्ष काढायचा होता आणि ना आता तसा विचार आहे. सचिन पायलटच्या मुद्द्याचा आज होणाऱ्या मंत्रिमंडळाशी काहीही संबंध नाही, असे रंधवा म्हणाले. राजस्थान काँग्रेसचे प्रभारी रंधवा पुढे म्हणाले की, काँग्रेस हायकमांड याकडे लक्ष देत आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील 90 टक्के समस्यांचे निराकरण झाले आहे आणि उर्वरित 10 टक्के मुद्दे देखील लवकरच सोडवले जातील.
'दोन नेत्यांमध्ये फॉर्मुला ठरला' : 29 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फॉर्म्युला तयार करण्यात आला असून, दोन्ही नेत्यांना फॉर्म्युला माहित असल्याचे रंधावा यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, केसी वेणुगोपाल बाहेर येऊन बोलण्याचे हेच कारण होते. निवडणुकीत नेत्याच्या उंचीनुसार त्याला पद आणि जबाबदारी दिली जाईल. दोन्ही नेत्यांमध्ये सामंजस्याचे सूत्र ठरले असून ते दोन्ही नेत्यांना माहीत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
या आधी देखील झाली आहे चर्चा : 2020 साली मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान देत सचिन पायलट यांनी बंड केले होते. तेव्हाही ते भाजपमध्ये जाण्याऐवजी 'प्रोग्रेसिव्ह काँग्रेस' नावाचा नवा पक्ष स्थापन करणार अशी चर्चा सुरु होती. सचिन पायलटचे वडील राजेश पायलट यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी प्रोग्रेसिव्ह काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता. परंतु तो पक्ष कधी अस्तित्वातच आला नाही. मात्र आता त्यामुळे त्या पक्षाचे नाव प्रत्येक वेळी सचिन पायलट यांच्यासोबत जोडले जाते.
हेही वाचा :
- Sachin Pilot News: राजस्थानमधील काँग्रेसंतर्गत वाद मिटेना... सचिन पायलट 11 जूनला करणार मोठी घोषणा करण्याची शक्यता