जयपूर Rajasthan Government Oath Ceremony : राजस्थानमध्ये भाजपाच्या भजनलाल शर्मा यांनी वाढदिवसालाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्र यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आधी सरपंच झाले. त्यानंतर दीर्घकाळ संघटनेत काम केल्यानंतर ते राज्यातील सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत. तर दिया कुमारी या जयपूरच्या माजी राजघराण्यातील सदस्य आहेत. यावेळी त्या सर्वाधिक मतांनी विजयी होऊन विधानसभेत पोहोचल्या आहेत. दुसऱ्यांदा आमदार झालेले उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी अशोक गेहलोत यांचे सल्लागार बाबूलाल नागर यांचा पराभव केलाय.
शपथविधीनिमित्त एनडीएचं शक्तिप्रदर्शन : जयपूरच्या रामनिवास बागेतील ऐतिहासिक अल्बर्ट हॉलसमोर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच इतर अनेक राजकीय व्यक्ती सहभागी झाले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, नितीन गडकरी, जेपी नड्डा, मनसुख मांडविय, रामदास आठवले, कैलाश चौधरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 18 लोक या समारंभाला राज्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्यमंत्री भजन लाल शर्मा : भरतपूरच्या नादबाईचे रहिवासी भजनलाल शर्मा जयपूरच्या सांगानेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा सुमारे 48 हजार मतांनी पराभव करुन पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. 56 वर्षीय भजनलाल यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून नादबाई इथून आमदारकीची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशीही त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. त्यांनी भाजपाच्या चार प्रदेशाध्यक्षांसह सरचिटणीस म्हणून काम केलंय. ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात.