जयपूर (राजस्थान) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज आपल्या या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी त्यांच्याकडून जुन्याच अर्थसंकल्पाची प्रत वाचण्यात आल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
कवितेने अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात : 11:00 वाजता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कवितेने अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. गेहलोत म्हणाले, जर आपले कर्म सत्य असेल तर आपल्याला त्या कर्माचे फळ निश्चितच मिळेल. प्रत्येक संकटावर उपाय आहे. तो आज नाही तर उद्या मिळेलच'. गेहलोत यांनी नरेगा, शालेय शिक्षण, शहरी हमी योजना, गरीब कुटुंबांना रेशनसह अनेक घोषणा केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केल्यानंतर मुख्य सचिव महेश जोशी यांनी त्यांना रोखले आणि ते वाचत असलेला हा अर्थसंकल्प जुना असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहात जुन्या अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असल्याची माहिती मिळताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. सुमारे ५ मिनिटे विरोधकांनी गदारोळ केला.
कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब : त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांना सभागृह चालू द्या, सभागृहाचे कामकाज उशिराने सुरू आहे, अशी विनंती केली. सभापतींच्या सततच्या सूचनांनंतरही विरोधकांनी आपला गदारोळ कमी केला नाही. वाढत्या गदारोळातच विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांच्या वागण्याने दुखावल्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले आहे.