महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानात 'राजे' येणार की 'परंपरा' बदलणार? विधानसभेच्या 199 जागांवर मतदान सुरु, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थानात आज विधानसभेच्या 199 जागांवर मतदान सुरु झालं असून या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Rajasthan Assembly Election
Rajasthan Assembly Election

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 9:45 AM IST

Updated : Nov 25, 2023, 1:11 PM IST

जयपूर Rajasthan Assembly Election : राजस्थानात आज विधानसभेच्या 199 जागांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. या निवडणुकीत राज्यातील 5 कोटींहून अधिक मतदार 1863 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. राज्यातील सर्व केंद्रांवर मतदारांचं आगमन सुरु झालं असून मतदान कर्मचारीही पूर्ण तयारीत आहेत.

मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था : निवडणूक आयोगानं राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 51507 मतदान केंद्रं स्थापन केली आहेत. तसंच राज्यातील 5 कोटी 26 लाख 90 हजार 146 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहेत. मतदान शांततेत पार पडावं, यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी, राज्याचे मुख्यमंत्री आणि सरदारपुरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक गेहलोत हे महामंदिर येथील वर्धमान जैन विद्यालयाच्या बूथ क्रमांक 111 वर कुटुंबासह मतदान करणार आहेत.

राजस्थानात 199 जागांवर मतदान :सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात या निवडणुकीत थेट लढत होत असल्याचं मानलं जात असून, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आक्रमक निवडणूक प्रचार गुरुवारी सायंकाळी थांबला होता. राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. मात्र काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळं करणपूर मतदार संघाची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.

दिग्गज निवडणुकीच्या मैदानात : या निवडणुकीतही सत्ताधारी काँग्रेसकडून दिग्गज नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी, मंत्री शांती धारिवाल, बीडी कल्ला, भंवर सिंग भाटी, सालेह मोहम्मद, ममता भूपेश, प्रताप सिंह खचरियावास, राजेंद्र यादव, शकुंतला रावत, उदय लाल अंजना, महेंद्रजित सिंग मालवीय आणि अशोक चंदना यांचा समावेश आहे. तर भाजपाकडून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, विरोधी पक्षाचे उपनेते सतीश पुनिया, खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड, बाबा बालकनाथ हे प्रमुख उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत.

कोणते पक्ष निवडणुकीच्या मैदानात :सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यासह सीपीआय (एम), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, भारत आदिवासी पार्टी, भारतीय आदिवासी पक्ष, आम आदमी पार्टी, एआयएमआयएमसह अनेक पक्ष राज्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे 40 हून अधिक बंडखोरही रिंगणात आहेत. सध्याच्या विधानसभेबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या काँग्रेसचे 107, भाजपचे 70, आरएलपीचे 3, सीपीआय (एम) आणि भारतीय आदिवासी पक्षाचे (बीटीपी) प्रत्येकी 2 तर राष्ट्रीय लोक दलाचा एक आमदार आहे. 13 अपक्ष आमदार असून दोन जागा (उदयपूर आणि करणपूर) रिक्त आहेत.

215 विद्यमान आमदारांना तिकीट : भाजपानं काँग्रेस आमदार गिरराज सिंह मलिंगा, सहा खासदार आणि एका राज्यसभा सदस्यासह 59 विद्यमान आमदारांना निवडणुकीचं तिकीट दिलंय. तर काँग्रेसनं 97 विद्यमान आमदारांना उमेदवारी दिलीय. यात सात अपक्ष आमदार आणि एक भाजप आमदाराचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण' प्रथमच राज्याबाहेर निवडणूक लढवणार, कोण आहे निशाण्यावर?
  2. 'पनौती', 'पाकिटमार' प्रकरणी निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
Last Updated : Nov 25, 2023, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details