जयपूर Rajasthan Assembly Election : मतदान हा लोकशाहीचा सण साजरा करण्यासाठी राजस्थानमधील मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखविली. यावेळी दिवाळीला घरी येण्याऐवजी लंडनमधील एक अनिवासी भारतीय कुटुंब मतदानाच्या वेळी जयपूरला आलं. जेणेकरुन त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क वापरता येईल. तसंच शुक्रवारी लग्न झालेल्या वधूनं विवाह समारंभानंतरचे विधी पुढं ढकलून प्रथम मतदानाला प्राधान्य दिलंय.
नववधूनं बिदाईपूर्वी केलं मतदान : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं. अशातच जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी एक एनआरआय कुटुंब लंडनहून जयपूरला पोहोचलं. दुसरीकडं आमेर विधानसभेच्या जाजोलाई तलाई येथे मतदान करण्यासाठी नवविवाहित दिव्या उर्फ अंजलीनं पाठवणीचा (बिदाई) कार्यक्रम पुढे ढकलून मताधिकाराचा वापर केलाय.
काय म्हणाली नवविवाहिता : मतदानानंतर नवविवाहित दिव्या उर्फ अंजली म्हणाली, "माझं शुक्रवारी लग्न झालं. शनिवारी सकाळी निघण्यापूर्वी मी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली. जेणेकरून परिसराचा विकास करणारा चांगला नेता निवडून यावा.'' अंजलीनं सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. त्याचवेळी तिचा पती जितेंद्र यानंही मतदानाला प्राधान्य देत आपल्या मतानंच चांगला नेता निवडला जातो, असं सांगितलं.