जयपूर :राजस्थानमध्ये आता लग्नाला १००हून अधिक लोक बोलावणे अधिक महागात पडणार आहे. यासाठी राज्यात यापूर्वी दहा हजार रुपयांचा दंड आकारला जात होता, मात्र त्याची रक्कम आता वाढवून २५ हजार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याबाबत रविवारी घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हे नियम लागू करण्यात आले आहेत.
रविवारी गहलोत यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, की प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरांच्या बाजरपेठांमध्ये गस्त घालत, नियमांचे पालन केले जात आहे, की नाही याची पाहणी करावी. यासोबतच, शनिवारपासून लागू करण्यात आलेल्या नाइट-कर्फ्यूबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
राज्य सरकारने शनिवारी जयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा, अलवर, उदयपूर आणि अजमेरमध्ये नाइट कर्फ्यू जाहीर केला आहे.