नवी दिल्ली : उत्तरेकडील राज्यात पावसाने हाहाकार उडाला असून आतापर्यंत 37 नागरिकांचा बळी गेला आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने ईशान्य राजस्थान आणि आसपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मान्सून दक्षिणेसह उत्तरेकडील पूर्व टोकावरही सक्रिय झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी कमी दाबाचा प्रभाव उत्तर पाकिस्तानपासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत आढळून येत असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
आज आणि उद्या या राज्याला आहे मुसळधार पावसाचा धोका :मुसळधार पावासामुळे उत्तर भारतामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे विस्थापनही करण्यात येत आहे. मात्र तरीही आज भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. दुसरीकडे उद्या म्हणजेच 12 जुलैला उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हिमाचलमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी :गेल्या काही दिवसापासून हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पहाडी राज्यातील अनेक जिल्ह्यांना 24 तासांसाठी 'रेड' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलन, शिमला, सिरमौर, कुल्लू, मंडी, किन्नौर आणि लाहौलमध्ये पुढील 24 तासात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उना, हमीरपूर, कांगडा आणि चंबामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप कुमार शर्मा यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. मंडी, किन्नौर आणि लाहौल-स्पितीसाठी पुढील 24 तासांसाठी मोठ्या अतिवृष्टीमुळे पुराचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे.
आज दिल्लीत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता :पुढील 5 दिवसात उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेश तसेच सुदूर उत्तर हिमाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम प्रमाणात मोठ्या प्रमाणात ते व्यापक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह पश्चिम राजस्थानमध्ये पावसात लक्षणीय घट अपेक्षित आहे. सोमवारच्या तुलनेत आज दिल्लीत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
मणिपूर, बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता: मणिपूर बिहारमध्ये काही ठिकाणी जोरदार हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवसात आणि त्यानंतर मणिपूर आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात 12 आणि 13 जुलै रोजी ओडिशा, झारखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच आज आणि उद्या अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता :कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 5 दिवसात गुजरातमधील काही प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता : या प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसात 11 आणि 12 जुलै रोजी पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता: कर्नाटकातील किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळमध्ये पुढील 5 दिवसात आणि आज किनारी आंध्र प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात मुसळधार पावसाचे कारण काय? : यावेळी जवळपास संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, हा पाऊस पश्चिमी विक्षोभ आणि मान्सून वारे यांच्या संयोगामुळे होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जुलैच्या पहिल्या काही दिवसात वायव्य भारतात झालेल्या पावसाने देशभरातील पावसाची कमतरता भरून काढली आहे. मान्सून हंगामातील एकूण पाऊस 243.2 मिमीवर पोहोचला आहे. तो सरासरी 239.1 मिमीपेक्षा दोन टक्के जास्त आहे. यापूर्वी जूनच्या अखेरीस देशभरात एकूण 148.6 मिमी पाऊस पडला होता. तो सामान्य पावसाच्या तुलनेत 10 टक्के कमी होता. केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) मते देशातील जलाशयांमधील पाण्याच्या उपलब्धतेतही सुधारणा होत आहे. यापूर्वी जुलैमध्ये सामान्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता.
हेही वाचा -
- Monsoon Update: प्रतीक्षा संपली; 48 तासात केरळमध्ये मान्सून होणार दाखल
- Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता