जम्मू आणि काश्मीर : जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे काम जम्मू - काश्मीरमधील चिनाब नदीवर सुरु आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा पूल सुरु होण्यापूर्वी यावर ट्रॉली चालवून याच्या ट्रॅकची यशस्वी चाचणी घेतली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॉलीमध्ये बसून हा पूल ओलांडला.
पूल सक्रिय भूकंपाच्या क्षेत्रात बांधला आहे :केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चिनाब नदीवर केबल माउंट केलेल्या जगातील या सर्वात उंच रेल्वे पुलाला अभियांत्रिकी चमत्कार म्हटले आहे. ते म्हणाले की, हा पूल अत्यंत सक्रिय भूकंपाच्या क्षेत्रात बांधला गेला आहे. तसेच तो 8 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपांना तोंड देऊ शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. नंतर त्यांनी ट्रॉलीने पूल पार केला.
पुढील वर्षी कार्यान्वित होईल : यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, खास डिझाइन केलेली वंदे भारत मेट्रो ट्रेन जम्मू आणि श्रीनगर दरम्यान धावण्यास सुरुवात होईल. ते पुढे म्हणाले की, हा प्रकल्प या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पावर, बक्कल आणि कुरी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पुल बांधला गेला आहे.
पूल काश्मीर आणि जम्मूला रेल्वेने जोडेल : चिनाब नदीवर बांधण्यात येणारा हा पूल काश्मीर आणि जम्मूला रेल्वेने जोडेल. यापूर्वी बरीओत्रा गाव ते बकाल या सात किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच अंजी खाड येथील केबल पुलाचे काम वेगाने सुरू आहे. रियासी जिल्ह्यातील खानीकोट, सावलाकोट येथे नऊ किमी लांबीचा बोगद्याचेही उद्घाटन करण्यात आले आहे. तेथे ट्रॅक टाकण्याचे कामही सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर हा पूल एकत्र जोडला जाईल.
हेही वाचा :Vande Bharat Train News : जम्मू काश्मीरला पुढील वर्षी मिळणार वंदे भारत रेल्वे - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव