मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. परिणामी मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेले मुंबई विभागाचे रविवारचे मेगा ब्लॉकचे वेळापत्रक Mega ( Block Schedule ) खालीलप्रमाणे असणार आहेत.
देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक :मध्य रेल्वेने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उद्या (रविवारी, 6 नोव्हेंबर ) मेगाब्लॉक (megablock) घेण्यात येणार आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानक दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे डाऊन धिम्या मार्गावरुन जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा : मध्य रेल्वेवरील घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या स्थानक दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील. तर पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष लोकलच्या फेऱ्या होणार :पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत बेलापूर / नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी नेरुळ स्थानक दरम्यान ट्रान्स हार्बर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.