नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गंगा नदीमध्ये मृतदेह तरंगताना आढळत आहे. त्यामुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे. या विदारक परिस्थितीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गंगेने बोलवलं आहे, असे म्हणणाऱ्यांनीच आता माँ गंगेला रडवलं आहे, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. गंगा नदीच्या किनारी जवळपास 2 हजारांपेक्षा जास्त मृतदेह आढळल्याचे वृत्त शेअर करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही भाजपा सरकारवर टीका केली. जे म्हणत होते गंगेने बोलवले आहे. त्यांनीच आता माँ गंगेला रडवलं आहे. गंगेकिनारी 2 हजार मृतदेह आढळले आहेत. गंगा मातेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असून ती आकांत करत आहे. भगवे वस्त्र परिधान करून उत्तर प्रदेशची राजसत्ता हाती घेतली. ते आता सत्तेच्या नशेत धुंद आहेत. जे म्हणत होते की गंगेने बोलवले आहे. ते आता दिल्लीच्या सिंहासनावर बसून हसत आहेत, असे टि्वट सुरजेवाला यांनी केले आहे.