नवी दिल्ली : ही लढाई आम्ही प्रेमाने जिंकली आहे. कर्नाटकमध्ये द्वेषाचा बाजार बंद झाला असून, प्रेमाचे दुकान उघडले आहे असा थेट टोला राहुल यांनी भाजपला लगावला आहे. तसेच, मी कर्नाटकच्या जनतेला धन्यवाद देतो आणि हा सर्वांचा विजय आहे, सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. त्यावेळी मी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्यासह ज्यांनी जे आश्वासन दिले आहेत ते पुर्ण करणार आहोत असही ते म्हणाले आहेत. आम्ही हे वायदे पहिल्याच दिवशी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करणार आहोत असही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.
पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे. कर्नाटकात काँग्रेसने तब्बल १३५ जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी वरील पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवकुमार यांचा विजय :कर्नाटक निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर सोपावण्यात आली होती. डी. के. शिवकुमार हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीमध्ये सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना बोलावण्यात येणार आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा दिल्लीत उद्या फैसला होणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी दोघेही उत्सुक आहेत. काँग्रेसचे दोन पर्यवेक्षक यासाठी नेमण्यात आले आहेत.
काँग्रेस अलर्ट :कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस अलर्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी आपले आमदार सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी ऑपरेशन सुरु केले आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. या ऑपरेशनुसार विजयी उमेदवारांना काऊंटिंग सेंटरवरूनच हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या विजयी आमदारांची बैठक होणार आहे.
हेही वाचा :Karnataka Election Results : हा भ्रष्ट भाजप आणि नरेंद्र मोदींचा पराभव आहे - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल