लखमीपूर खेरी (लखनौ) - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे बहीण प्रियंका गांधी यांच्यासमवेत अखेर आज लखमीपूर गावात पोहोचले. यावेळी त्यांनी जीपने चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. उत्तर प्रदेशमधील लखमीपूर जिल्ह्यातील तिकूनिया गावाजवळ झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने लखमीपूरमध्ये संतप्त वातावरण आहे.
राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांनी पालिया गावातील चौखादा शिवारात लवप्रीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट बुधवारी रात्री नऊ वाजता भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
हेही वाचा-रामायणमधील 'रावण' हे पात्र साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन
या भेटीबाबत राहुल गांधींनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की शहीद लवप्रीत यांच्या कुटुंबाला भेटून दु:ख व्यक्त केले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे. लवप्रीत तुमचे बलिदान विसरू देणार नाही.
हेही वाचा-LAKHMIPUR केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करा- राकेश टिकैतांचा योगी सरकारला आठवडाभराचा अल्टीमेटम
गांधींच्या भेटीदरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, राज्यसभेचे खासदार दीपेंद्र सिंह हुडा उपस्थित होते. सितापूर ते लखमीपूर मार्गावर जागोजागी बॅरिकेडस लावण्यात आल्या होत्या. लखमीपूर जिल्हा प्रशासनाने नेत्यांच्या केवळ सात वाहनांना जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली होती. काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना मोरादाबाद येथे ताब्यात घेण्यात आले. ते कारने लखमीपूरच्या दिशेने येत होते. आपचे खासदार संजय सिंह हेदेखील लखमीपूरमध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दाखल झाले होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाचे महासचिव सतीश चंद्र मिश्रा हे गुरुवारी लखमीपूरला भेट देणार आहेत.
हेही वाचा-अखेर योगी सरकार झुकलं; राहुल गांधी सीतापूरमध्ये दाखल, प्रियंकांसह लखीमपूर खेरीकडे होणार रवाना
काँग्रेसची आक्रमक भूमिका आणि वाढत्या दबावाने झुकले योगी सरकार
काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे व जनतेच्या वाढत्या दबावापुढे यूपीतील योगी सरकारने एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या 5 सदस्यीय प्रतिनिधिमंडळला प्रियंका गांधींना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींना लखनौ विमानतळावर रोखण्याची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी लखनौकडे रवाना झाले. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींना लखीमपूर खेरी व सीतापूरल जाण्याची परवानगी देण्यात आली.
काय घडली होती घटना?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे