नवी दिल्ली - मुस्लीम व्यक्तीला 'जय श्री राम' नारा देण्यास जबरदस्ती करणाऱ्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'संविधानातील कलम 15 आणि कलम 25 देखील विकून टाकले का', असा खोचक प्रश्न राहुल यांनी ट्विट करून उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी केंद्र सरकारच्या 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन' धोरणावर टीका करताना दिसून येत आहेत.
राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मुस्लीम व्यक्तींना 'जय श्री राम' ही घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केलेल्या वेगवेगळ्या घटना या व्हिडिओमध्ये आहेत. उज्जैनमध्ये घडलेली घटनाही या व्हिडिओत आहे. नुकतेच मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका मुस्लीम व्यक्तीला जबरदस्तीने 'जय श्रीराम' बोलण्यास भाग पाडल्याची घटना घडली. मुस्लीमेत्तर परिसरात जाऊन भंगार गोळा करत असल्याने संबंधित मुस्लीम व्यक्तीला समाजकंटकांनी जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले.
काय आहे कलम 15 आणि 25 ?
पूर्वापार भारत पारतंत्र्यात असल्याने स्वातंत्र्यानंतर मात्र व्यक्तिस्वातंत्र्यावर भर देऊन त्यासाठी भारतीय राज्यघटनेत 'कलम 15′ समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार व्यक्तीला धर्म, व्यवसाय, वास्तव्य अशा अनेक बाबतीत स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले. त्याचा सरळ अर्थ म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी धर्म, जात, लिंग, यावरून भेदभाव करता येणार नाही. तर कलम 25 नुसार प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र आहे. याचा साधा अर्थ असा की भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे. तसंच त्या धर्माप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही याची काळजी घेण्याचंही सांगण्यात आलं आहे.
'मन की बात'वरून राहुल गांधींचा निशाणा -
रविवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातवरून केंद्रावर निशाणा साधला आहे. एक ट्विट करून राहुल यांनी केंद्राला लक्ष्य केले आहे. "देश कर रहा है मित्र-मनॉपली की बात!" असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
हेही वाचा -' गेल्या 70 वर्षात जे देशाने कमावलं, ते सर्व मोदी विकत आहेत'; राहुल गांधींची टीका