नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून चिंता व्यक्त केली. अप्रत्यक्षपणे केंद्रावर निशाणा साधला. कोरोनाप्रती सावधान राहावे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन राहुल गांधींनी नागरिकांना केले आहे.
राहुल गांधी यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा आलेख टि्वटरवर शेअर केलाय. कोरोनासंदर्भात मी यापूर्वीच चेतावनी दिली होती. कोरोना आताही देशासाठी मोठा धोका आहे. सर्वांनी सावधानगिरी बाळगावी आणि मास्कचा वापर करावा. तसेच कोरोनाच्या इतर सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधींची चेतावनी -
राहुल गांधी यांनी 17 फेब्रवारीला टि्वट करून कोरोनासंदर्भात केंद्र सरकारला चेतावनी दिली होती. जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून अद्याप कोरोना महामारी संपलेली नाही. केंद्राने कोरोना परिस्थिती हाताळण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाबाबत सरकारला अतिविश्वास आहे. मात्र, अद्याप कोरोना संपलेला नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या -
देशात गेल्या 24 तासामध्ये 26 हजार 291 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 हजार 455 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 118 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 1 कोटी 13 लाख 85 हजार 339 आहे. तर 1 कोटी 10 लाख 7 हजार 352 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर सध्या 2 लाख 19 हजार 262 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 58 हजार 725 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 99 लाख 8 हजार 38 जणांना लस टोचवण्यात आली आहे.
हेही वाचा -देशद्रोह खटला : न्यायालयात हजर कन्हैया अन् उमर खालिद, अन्य सात जणांना जामीन मंजूर, वाचा सविस्तर