नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी 29 - 30 जून दरम्यान हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार आहेत. या दरम्यान ते मदत शिबिरांमध्ये लोकांना भेटतील आणि स्थानिक समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 3 मे पासून जातीय हिंसाचारात अडकलेल्या मणिपूरमध्ये राहुल गांधींची ही पहिलीच भेट आहे.
29 - 30 जून रोजी मणिपूरला भेट देणार : ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट केले की, 'राहुल गांधी 29 - 30 जून रोजी मणिपूरला भेट देणार आहेत. ते आपल्या दौऱ्यात इम्फाळ आणि चुराचंदपूर येथील मदत शिबिरांना भेट देतील. तसेच तेथील स्थानिक समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. मणिपूर जवळजवळ दोन महिन्यांपासून जळत आहे. राज्याला संघर्षातून शांततेकडे वाटचाल करता यावी यासाठी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.
आत्तापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू : वेणुगोपाल पुढे म्हणाले की, 'ही मानवीय शोकांतिका आहे. त्यामुळे द्वेषाची नव्हे तर प्रेमाचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे'. मणिपूरमधील हिंसाचारात आत्तापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीसाठी काँग्रेसने भाजप आणि पक्षाच्या 'विभाजनाच्या राजकारणाला' जबाबदार धरले आहे. या मुद्यावर 24 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मणिपूरला भेट द्यावी, अशी मागणी केली होती.
शांततेसाठी प्रयत्न चालू - गृहमंत्री : बैठकीत काँग्रेसने मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना तत्काळ पदच्युत करण्याची मागणी केली. तर समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तथापि, सरकारने आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ठामपणे सांगितले. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमच्याकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा :
- Cabinet Meeting : परदेशातून परतल्यानंतर मोदींनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक, मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा
- Manipur Violence : 'मणिपूर मुख्यमंत्र्यांना हटवा, नाहीतर राष्ट्रपती राजवट लावा', विरोधी पक्षांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी