नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मानहानीच्या खटल्यातील त्यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. ते सोमवारी गुजरातला पोहोचणार असून सुरतच्या सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. 11 दिवसांपूर्वी मोदी आडनाव प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. कर्नाटकातील सभेत राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली होती. राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व संपले असून, त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीसही मिळाली आहे.
जिल्हा न्यायालयात दाद मागणार:लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की, कोणत्याही खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप संपते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी 12.30 वाजता सुरत कोर्टात पोहोचू शकतात. सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ते जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत. यावेळी हजारो काँग्रेस कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर उपस्थित राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींचे स्वागत करतील. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासोबत राहू शकतात. जी काही कागदपत्रे तयार करायची होती, ती तयार केली आहेत, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.