जयपूर -काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारीपासून दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी हनुमानगड आणि गंगानगर येथे सभेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
शेतीचा व्यवसाय हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. हा व्यवसाय आणि इतर व्यवसाय यांच्यात फरक आहे. उर्वरित व्यवसाय एक किंवा दोन लोक चालवित आहेत. तर हा व्यवसाय कोट्यावधी लोकांद्वारे चालविला जातो. त्याचा एकाही मालक नाही, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत प्रयत्न केले आहेत की हा व्यवसाय कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नाही. तर 40 टक्के लोकांच्या हाती असावा, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांची मोदींवर टीका देशातील शेतकरी जागरूक आहेत. म्हणून त्यांनी अंधारामध्येही मशाल पेटवली. कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे केवळ शेतकरीच नाही तर मध्यमवर्गाचेही नुकसान होणार आहे. सर्वजण बेरोजगार होतील, असे गांधी म्हणाले. देशातील शेतकऱ्यांसमोर जर इंग्रज उभे राहू शकले नाहीत. तर नरेंद्र मोदी कोण आहेत. त्यांनी हट्टीपणा सोडवा आणि कायदे रद्द करावे. नाहीतर देशातील शेतकरी आणि कामगार पंतप्रधानांना आपली शक्ती दाखवतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान भित्रे आहेत -
राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेतही मोदींवर टीका केली. काल संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत पूर्व-लडाखबाबत काही वक्तव्य केले. आता कळत आहे, की 3 या ठिकाणी आपले सैन्य तैनात करण्यात आले आहे. तेथील फिंगर 4 हा भाग भारताचा भूभाग आहे. मात्र, तरीही आपले सैनिक फिंगर 4 वरुन फिंगर 3 वर आणण्यात आले आहेत. आपला हा भूभाग मोदींनी चीनला का दान केला आहे?, असा सवाल त्यांनी केला. आपले पंतप्रधान भित्रे आहेत, ते चीनच्या समोर उभे ठाकण्यास घाबरतात. एवढेच नाही, तर चीनसमोर उभे ठाकणाऱ्या आपल्या जवानांच्या बलिदानाचाही ते विश्वासघात करत आहेत. ते आपल्या सैन्याच्या बलिदानावर अक्षरशः थुंकत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली.