नवी दिल्ली - अर्थसंकल्पात सैन्यांसाठी मोठी तरतूद नसल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींना सैनिकांची चिंता नाही. ते फक्त आपल्या तीन-चार भांडवलदार मित्रांना मदत करण्यासाठी काम करतात, असे राहुल गांधी म्हणाले.
'अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली. तसेच शेतकरी आणि जवानांसाठी काहीच मोठी तरतूद केली नाही. त्यांच्यासाठी फक्त त्यांचे 3-4 उद्योगपती मित्रच देवासमान आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अर्थसंकल्पामध्ये संरक्षण विभागासोबत धोका झाला आहे. देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल यासाठी अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही, असे ते म्हणाले होते. नरेंद्र मोदी हे भारतातील मालमत्ता आपल्या भांडवलशाही मित्रांना देण्याची योजना आखत असल्याचेही ते म्हणाले होते.
सरकारने देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी लघु व मध्यम उद्योग, शेतकरी आणि कामगारांना पाठिंबा द्यायला हवा, असेही गांधी यापूर्वी म्हणाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता, ज्याला आवाजी मतदानाने मंजूरी मिळाली होती.