नवी दिल्ली - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. युद्धाच्या छायेतील युक्रेनमधून अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. यात भारतीयांचाही समावेश आहे. मात्र, युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव ( Indians being beaten in Ukraine ) होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. युक्रेनमधील विध्वसंक परिस्थितीचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यातच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असाच एक व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi Shares Video Of Indian Students ) टि्वट केला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्राला केले आहे.
राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटलं, की युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसोबत तसेच त्यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारने ताबडतोब तपशिलवार निर्वासन योजनेची माहिती द्यावी. संकटग्रस्त देशात आपण आपल्या प्रियजनांना सोडू शकत नाही. याआधी, राहुल गांधींनी कर्नाटकातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये एका बंकरमध्ये अडकलेले दिसत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. बंकरमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांचे हे दृश्य अस्वस्थ करणारे आहे. अनेक विद्यार्थी पूर्व युक्रेनमध्ये अडकले आहेत, असे ते म्हणाले होते.
युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पोलंडच्या सीमेवर तैनात असलेल्या काही युक्रेनियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या एका गटाला मारहाण केल्याचा आणि धमकावल्याची माहिती आहे. भारत सरकार युक्रेनला पाठिंबा देत नाही. मग आम्ही तुम्हाला सहकार्य का करू, असे युक्रेनच्या सैन्यांनी विद्यार्थ्यांना म्हटल्यांची माहिती आहे.