नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेत केलेल्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली होती. या नोटिशीला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयात सविस्तर उत्तर सादर केले आहे. सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांविरोधात टीका केली होती.
वक्तव्याचे केले समर्थन:राहुल यांना 10 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात, लोकसभा सचिवालयाने त्यांना भाजप खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या विरोधात बजावलेल्या विशेषाधिकार भंग नोटीसचे उत्तर 15 फेब्रुवारीपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या विचारार्थ सादर करण्यास सांगितले होते. राहुल गांधींच्या ७ फेब्रुवारीच्या भाषणावर भाजप खासदारांनी नोटीस बजावली होती, ज्यात त्यांनी हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणावर भाष्य केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
कायद्यांची उदाहरणे देत सविस्तर उत्तर:राहुल यांनी विविध कायदे आणि उदाहरणे देत अनेक पानांत सविस्तर उत्तर दिले आहे. सोमवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाड येथे एका मेळाव्याला संबोधित करताना, राहुल यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणातील अनेक टिप्पण्या हटविण्याच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेस नेत्याने असेही म्हटले होते की त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आलेल्या त्यांच्या प्रत्येक टिप्पणीबद्दल माहिती आणि पुरावे दिले आहेत.