हैदराबाद- अग्नीपथ योजनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. दरवर्षी 60,000 सैनिक निवृत्त होतात, त्यापैकी फक्त 3000 सैनिकांना सरकारी नोकऱ्या मिळतात. 4 वर्षांच्या करारावर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निवीरांचे भविष्य काय असेल? असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला ( Rahul Gandhi on Agnipath scheme ) विचारला आहे.
अग्नीपथ योजनेवरून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेच्या या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि तरुणांचे भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
भारतीय हवाई दलातील अग्निवीरवायू भरतीसाठी नोंदणी ( Army on Agneepath scheme ) प्रक्रिया संपली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत झाली. यासाठी हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता भारतीय हवाई दलाने ट्विट करून माहिती दिली आहे की, या भरतीसाठी विक्रमी 7,49,899 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही भरती चक्रात सर्वाधिक 6,31,528 अर्जांची नोंदणी झाली होती.
२५ टक्के उमेदवार होणार कायम :अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर देशभरातील तरुणांनी याला विरोध दर्शवला होता. असे असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले आहेत. लष्कराने अग्निवीर भरती रॅलीची अधिसूचनाही जारी केली असून नौदलातही अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना कोणत्याही सैन्यात केवळ 4 वर्षांसाठी भरती केली जाईल, त्यानंतर, आवश्यक असल्यास, जास्तीत जास्त 25 टक्के उमेदवार कायमस्वरूपी होऊ शकतात.