नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१० ऑगस्ट) संसदेत अविश्वास प्रस्तावावर भाषण दिले. या भाषणादरम्यान राहुल गांधी संसदेत अनुपस्थित होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'मणिपूरमध्ये लोक मारले जात आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. त्याचवेळी पंतप्रधान संसदेत हसत हसत उत्तर देत आहेत. हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही', अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे : काल पंतप्रधान मोदी संसदेत सुमारे २ तास १३ मिनिटे बोलले. या दरम्यान ते मणिपूरवर केवळ २ मिनिटे बोलले. मणिपूर गेले अनेक महिने जळत आहे. तेथे लोक मारले जात आहेत, बलात्कार होत आहेत, मात्र पंतप्रधान संसदेत हसत होते, विनोद सांगत होते. असे करणे त्यांना शोभत नाही. मणिपूरमध्ये जे काही चालले आहे, ते का थांबवले जात नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय सैन्य मणिपूरमधील हिंसाचार २ दिवसात थांबवू शकते. मात्र पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे. त्यांना आग विझवायची नाही, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी नरेंद्र मोदींवर केला.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी भारत मातेची हत्या केली : '१९ वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले, ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मी संसदेत म्हटलं होतं, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी भारत मातेची हत्या केली. मी हे शब्द असेच वापरले नाहीत', असे राहुल गांधी म्हणाले. मणिपूरमध्ये जेव्हा आम्ही मैतेई भागात गेलो तेव्हा आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की आमच्या सुरक्षा पथकात काही कुकी असल्यास त्यांना येथे आणू नका, कारण ते त्यांना मारतील. तसेच जेव्हा आम्ही कुकी भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आम्ही कोणत्याही मैतेईला आणले तर ते त्याला गोळ्या घालतील. तेथे एक राज्य नाही, दोन राज्ये निर्माण झाली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.
पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकले असते :'पंतप्रधान नरेंद्र मोदी किमान मणिपूरला तरी जाऊ शकले असते. ते तेथील समुदायांशी बोलले असते आणि म्हणाले असते की मी तुमचा पंतप्रधान आहे, चला बोलूया. मात्र त्यांचा तसा काही हेतू दिसत नाही. प्रश्न हा नाही की २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान होतील, प्रश्न मणिपूरचा आहे. तेथे लहान मुले, निरपराध लोक मारले जात आहेत', असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
- Parliament Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक; अमित शाहांनी लोकसभेत मांडले नागरिक सुरक्षा विधेयक
- PM Modi On Opposition : 'देश आपल्याबरोबर आहे' मणिपूरवासियांना मोदींनी दिला विश्वास, काँग्रेसचे काढले वाभाडे
- PM Narendra Modi on Manipur : मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास