नवी दिल्ली :मोदी आडनावावरूनमानहानी प्रकरणातखासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या काळात देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे.
भाजप खासदारांनी माझ्यावर खोटे आरोप केले : पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'संसदेत भाजप खासदारांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मी खूप वेळा बोलण्यास वेळ मागितला, पण त्यांनी मला वेळ दिला नाही. मी या आधी पण बऱ्याच वेळा म्हटलं आहे की भारतात लोकशाहीवर हल्ला होतो आहे. याचे अनेक उदाहरणं वारंवार समोर येत आहेत. मी संसदेत यावर पुरावे देखील दिले आहेत'. देशात लोकशाही वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
'अदानीवरील भाषणाने पंतप्रधान घाबरले' :राहुल गांधींनी अदानी आणि मोदींच्या संबंधावरही भाष्य केले. अदानींना फायदा करून देण्यासाठी विमानतळाच्या नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अदानीवरील माझ्या पुढच्या भाषणाने पंतप्रधान घाबरले आहेत, आणि मी त्यांच्या डोळ्यात ते पाहिले आहे, असे ते म्हणाले. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे गेले?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गांधी कुटुंबातील कोणी वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी घाबरून जे काम केले त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे देखील ते म्हणाले.